चिंतोपंतांच्या जगात…

ऑगस्ट 2, 2007

सुरेख लेख

Filed under: Uncategorized — Shreyas @ 12:37 सकाळी

सुरेख लेख

(मथळा वाचुन गैरसमजांचे ‘अफाट’ वारे, ‘सुसाट’ वाहण्याची, ‘अचाट’ शक्यता आमच्या मनाच्या वेधशाळेने वर्तविल्याने, एक ‘प्रिपेड’ खुलासा: ‘सुरेख’ हे विशेषण प्रस्तुत लेखासाठी वापरलेले नाही. हा लेख सुरेख आहे, अथवा नाही, हे तर लेख पूर्ण वाचून (झाल्यास!) तुम्हीच ठरवायचे आहे. असो!)

एक सुरेख लेख लिहावा, म्हणून आम्ही लेखणी हातात धरताच, त्यातून शाईच न फुटणे अथवा जास्त फुटणे, असे ‘फुट’कळ प्रसंग घडू लागले. पण एवढ्याशाने ‘कच’ खायला, आम्हीही काही ‘कच्चे’ भिडू नाही. असे कित्येक ‘फुट’कळ प्रसंग आम्ही चक्क ‘फुटा’णे खात पचविले आहेत. शेजारच्या लंबोदर वाण्याकडून (हे त्याचे नाव नसून, ‘पोट’नाव आहे. जशी पोटजात असते, तसे पोटनाव का असू नये?) बॉल पेन विकत आणून, अडचणींचा हा पहिलाच बॉल, आम्ही थेट सीमापार धाडला.

पण आता “लिहायचं काय?” हा यक्षप्रश्न, आमच्या खादाड टॉमीसारखा मोठ्ठा आ वासून समोरच उभा! आता हे पाहून, ‘स्वॉमीभक्त टॉमी’ किंवा ‘भुकेचा प्रश्न मिटेल काय?’, अशा प्रासंगिक आणि संवेदनशील विषयांची वावटळ मनात भिरभिरु लागली. मग त्या वावटळीला आणि गालाशी भिरभिरणाऱ्या डासाला, आम्ही एकाच फटक्यात जमीनदोस्त केले, अन् पटकन टॉमीला एक चपातीचा तुकडा घातला. तो मटकावून टॉमी शांतपणे झोपला.

आता हा साक्षात लंबोदराने (शेजारचा वाणी नव्हे!) साक्षात आपल्यालाच, साक्षातच दिलेला, साक्षात साक्षात्कार आहे (हूश्श्य!), हे आमच्या लक्षात आलं आणि देहरुपी महालाच्या वरच्या कक्षात लख्ख प्रकाश पडला!

“कालची सारी पोरं, झोपून आणि स्वप्न पाहूनच तर आजची थोरं झालीत ना!”

मग अधिक न ताणता, आम्ही पण चक्क ताणून दिली.

आता स्वप्ने तरी कसली ‘फुटकी’ पडावीत?

सारे आभाळच त्या फुटलेल्या शाईच्या काळोखात गुडूप झालंय; त्या भयाण काळोखात, आम्ही भाषारुपी खाणीतून, शब्दरुपी कोळसा काढतोय; तो कोळसाही काही निघेना, कारण कोळश्याचं घमेलंही फुटकंच; असे काहीच्या बाही दिसू लागले. तेवढ्यात भयानक गोंगाट सुरु होऊन, कुणीतरी पाय ओढतोय आणि त्या खाणीत आम्ही पडतोय असे दिसले, आणि आम्ही दचकूनच उठलो!

गोंगाट कसला कपाळ! तो तर, आमचे धोतर खेचत, टॉमीने आरंभलेला, भूभूत्कार होता. बाहेर कुठल्या तरी अजब दिसणाऱ्या माणसावर, तो आपला “freedom of expression” चा अधिकार बजावत होता.

मनात विचार आला: घ्या! याला सुद्धा जमतं. भुंकून का होईना, पण express तरी करता येतं. आमचे मात्र जरा कठीणंच. असो. बहुधा मुहूर्तच चुकला असावा, असं म्हणत आम्ही परत एका नव्या चिंतेत!

…आपला चिंतोपंत

जुलै 14, 2007

मीच चिंतोपंत…

Filed under: Uncategorized — Shreyas @ 12:09 सकाळी

नमस्कार!

तर आमची सर्वसाधारण ओळख तुम्हाला आहेच. पण ओळख ‘असणे’ आणि ओळख ‘पटणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या! आमची ओळख ‘पट’कन ‘पटा’वी यासाठी,

हे घ्या अमुचे छायाचित्र…

chinpa.JPG

जून 8, 2007

चिंतोपंत उवाच…

Filed under: Uncategorized — Shreyas @ 9:25 सकाळी

नमस्कार! आम्ही चिंतोपंत, म्हणजेचचिंतामणराव घालमेलकर’. तसं पाहीले तर हे काही आमचे पाळण्यातलं नाव नाही, पण पाळण्यापासूनच आमच्या मस्तकावर असलेली ठळक ललाटरेषा(ही आमची जन्मखूण!) पाहून, अप्पांनी (आमचे तीर्थरूप) आमचे नामकरणचिंता-मण’ असे केले. असो! नावात काय आहे? तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हास लेखनाचा हा नवा छंद जडला आहे. अखंड मराठी भाषेलाआपलेच’ कुरण समजून, आमची लेखणीरूपी बकरी त्यावर मनसोक्तपणे चरविण्याचा अमुचा हा सालस प्रयास, आपण गोड करून घ्यावा! आपल्या टीका आणि सूचना यांची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट पाहू. कळावे.

आपला चिंतोपंत

goat.jpg

Theme: Rubric. Blog at WordPress.com.

Follow

Get every new post delivered to your Inbox.